साप चावल्याने 32 वर्षीय सर्पमित्राचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वार्ड येथील सर्पमित्र महेंद्र भडके (वय ३२) यांचा नाग साप चावल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बल्लारपूर पेपर मिल परिसरातील न्यू कॉलनीजवळील उर्वरा कृषी प्रायव्हेट लिमिटेड नर्सरी येथे घडली.
नर्सरी परिसरात नाग साप दिसल्याची माहिती मिळताच नर्सरी व्यवस्थापनाने सर्पमित्र महेंद्र भडके यांना घटनास्थळी बोलावले. त्यांनी साप पकडण्याचा प्रयत्न करत असताना नाग सापाने त्यांना दोन वेळा चावले. तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रविवारी मृतदेह उर्वरा कृषी प्रायव्हेट लिमिटेड नर्सरीत आणून ठेवत आर्थिक मदतीची मागणी केली. नर्सरीचे एच.आर. सिद्धार्थ खवसे यांनी सोमवारी (६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेपर्यंत मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मदतीसाठी गेलेल्या नातेवाईकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी टाळाटाळ केली. अखेर संतप्त नागरिकांनी सोमवारी सायंकाळी पुन्हा मृतदेह नर्सरीत आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला.
शेवटी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, उर्वरा कृषी प्रायव्हेट लिमिटेडचे एच.आर. सिद्धार्थ खवसे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झामरे, प्रशांत झामरे, गौतम रामटेके, रतन बांबोडे, देवीदास करमनकर, उमेश कडू, अभिलाष चूनारकर, नागेश रत्नपारखी, संपत कोरडे, ऍड. डेगावार, ऍड. संजय बुरांडे, ऍड. सुमित आमटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर पठाण, पो.उ.नि. प्रेमशाह सोयाम, साळुंखे आदींच्या मध्यस्थीने नर्सरी व्यवस्थापनाने पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीस मान्यता दिली.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झामरे यांनी अथक प्रयत्न करून मृतकाच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरच नर्सरी प्रशासनाने मदतीस मान्यता दिली.
त्यापैकी एक लाख रुपये मृतकाच्या पत्नीच्या खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले असून उर्वरित चार लाख रुपयांचा धनादेश सुरक्षारूपाने देण्यात आला आहे. काही दिवसांत उर्वरित रक्कम खात्यात जमा करण्यात येईल, असा लेखी करार सर्व उपस्थितांच्या साक्षीने करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.